हायड्रॉलिक रुग्ण पलंग, व्हीलचेअर, वॉकरसह विविध वैद्यकीय साहित्य उपलब्ध; केवळ पातूर शहरातील नागरिकांसाठी सेवा
पातूर : गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारादरम्यान आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून ‘सक्षम रुग्ण सेवा बँक’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, ही सेवा केवळ पातूर शहरातील नागरिकांसाठीच उपलब्ध राहणार आहे. शहरातील गरजू रुग्णांना आवश्यक वैद्यकीय साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला आहे.अनेकदा रुग्णालयातून घरी आल्यानंतर रुग्णांना काही काळासाठी हायड्रॉलिक रुग्ण पलंग, व्हीलचेअर, वॉकर तसेच कमोड चेअर यांसारख्या साहित्याची आवश्यकता असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे हे साहित्य खरेदी करणे अनेक कुटुंबांना शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन पातूर शहरातील गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत खालील वैद्यकीय साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
हायड्रॉलिक रुग्ण पलंग
व्हीलचेअर
वॉकर
कमोड चेअर
इतर आवश्यक वैद्यकीय साहित्य.
मानवसेवेचा सामाजिक संकल्प!गरजू रुग्णांना उपचाराच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये आणि आवश्यक वैद्यकीय साहित्य वेळेवर मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
हा सामाजिक उपक्रम सक्षम प्रतिष्ठान, निसर्ग संजीवनी फाउंडेशन आणि शेतकरी जागर मंच यांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
दिवाळीच्या शुभपर्वावर सुरू होणारा हा आरोग्य सेवेचा उपक्रम पातूर शहरातील गरजू रुग्णांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. खऱ्या अर्थाने रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करणारा ठरेल.
महत्त्वाचे : या रुग्ण सेवा बँकेचा लाभ केवळ पातूर शहरातील नागरिकांनाच घेता येणार आहे.







