पातूर प्रतिनिधी : गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचा संदेश देत लोकमान्य टिळक गणेश उत्सव मंडळ,ढोणे नगर,पातूर यांच्या वतीने निर्माल्य संकलन व तलाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
गणेशमूर्ती विसर्जनानंतर तलाव परिसरात जमा झालेले निर्माल्य, फुलमाळा व इतर कचरा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित करून परिसराची स्वच्छता केली.या उपक्रमातून जलस्रोतांचे संवर्धन,पर्यावरण रक्षण तसेच स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत तलाव परिसर स्वच्छ केला. ‘उत्सव आनंदाचा,संकल्प स्वच्छतेचा’या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत पर्यावरणपूरक उपक्रमांची परंपरा यापुढेही कायम ठेवण्याचा संकल्प मंडळाच्या वतीने करण्यात आला.याबाबतची माहिती मंडळाचे मार्गदर्शक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.शिवकुमारसिंह बायस यांनी दिली.







