जमिनीला समृद्धी महामार्गाच्या दराप्रमाणे मोबदला देण्याची मागणी; १७ सप्टेंबरला तहसील कार्यालयात बैठक
पातूर : नळगंगा–वैनगंगा नदीजोड प्रकल्पामुळे पातूर तालुक्यातील बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शिवसेना संपर्कप्रमुख, उपनेते तथा बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. नितीनजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पातूर येथील रेस्ट हाऊस येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.

या बैठकीत प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी उपविभागीय अधिकारी, बाळापूर, तहसीलदार, पातूर तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गाच्या दराप्रमाणे मोबदल्याची मागणी
नळगंगा–वैनगंगा नदीजोड प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीला समृद्धी महामार्गाच्या दराप्रमाणे योग्य व न्याय्य मोबदला देण्यात यावा, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
तसेच शेतकऱ्यांना योग्य व न्याय्य मोबदला मिळाल्याशिवाय आणि त्यांच्या हक्कांचा योग्य विचार केल्याशिवाय जमिनीचा ताबा घेऊ नये, अशी मागणीही बैठकीत मांडण्यात आली.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
१७ सप्टेंबरला तहसील कार्यालयात बैठक
या पार्श्वभूमीवर गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता पातूर तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
नळगंगा–वैनगंगा नदीजोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या पातूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या समस्या, अडचणी आणि मागण्या मांडण्यासाठी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.







