पातुर प्रतिनिधी : आगामी सण-उत्सव तसेच ईद-ए-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पातुर शहरात, दि.२५ ऑगस्ट रोजी पोलिसांच्या वतीने मुख्य मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला.

पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च आयोजित करण्यात आला होता.यावेळी पोलिसांनी जुने बस स्टँड चौक,मिलिंद नगर चौक,चिरा चौक,सय्यदपुरा,शाहबाबू वेस,दर्गा रोड,गोंडवेस तसेच शहरातील प्रमुख मार्गांवरून पथसंचलन करत पाहणी केली.

आगामी सण-उत्सव शांततेत व सुरळीत पार पडावेत,तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी,या उद्देशाने पोलिसांनी शहरातील संवेदनशील व प्रमुख भागांची पाहणी केली.

यावेळी पातुर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुहास गोसावी,उपनिरीक्षक अजय वानखडे,खुफिया जमादार हिम्मतराव डिगोळे,पोलीस कर्मचारी तसेच ईद-ए-मिलाद बंदोबस्तासाठी नियुक्त महिला पोलीस कर्मचारी,होमगार्ड व सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सण-उत्सवाच्या काळात नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले.







