राजंदा, ता. बार्शीटाकळी : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या शिवाजी विद्यालय, राजंदा या शाळेने शैक्षणिक व गुणवत्तापूर्ण कार्याची परंपरा कायम ठेवत सलग चार वर्षांपासून विविध पुरस्कार प्राप्त करण्याचा मान मिळविला आहे. शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे राजंदा परिसराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
शैक्षणिक सत्र २०२२-२३ पासून मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानात शाळेने सलग दोन वर्षे पुरस्कार प्राप्त केला असून, तिसऱ्या वर्षीही शाळेने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत राज्यातून जिल्हास्तरावर निवड करण्यात आलेल्या शाळांमध्ये अकोला जिल्ह्यातून शिवाजी विद्यालय, राजंदा या शाळेची निवड झाली असून, शाळेला ५ लाख रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
यासोबतच नुकताच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा माध्यमिक शाळा गुणवत्ता ‘विद्यारत्न शंकरराव उपाख्य मामासाहेब लोंढे स्मृती पुरस्कार’ शाळेला प्राप्त झाला आहे. या यशाबद्दल शाळेचे माजी मुख्याध्यापक डॉ. अविनाश बोर्डे यांनी आनंद व्यक्त केला.

आपल्या कार्यकाळानंतर शाळेची धुरा सांभाळणारे मुख्याध्यापक श्री. सुनील बैस तसेच त्यांना समर्थ साथ देणाऱ्या संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे डॉ. बोर्डे यांनी नमूद केले.
दरम्यान, या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी श्री. हेमंत पाथ्रिकर यांना संस्थेचा स्वर्गीय बी.एस. उर्फ डॅडी देशमुख स्मृती उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
शाळेच्या सातत्यपूर्ण यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. सुनील बैस, पुरस्कारप्राप्त कर्मचारी श्री. हेमंत पाथ्रिकर तसेच संपूर्ण राजंदा ‘शिव परिवाराचे’ सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
— डॉ. अविनाश बोर्डे
माजी मुख्याध्यापक, राजंदा







