अकोला : श्रावणाच्या तिसऱ्या आठवड्यात कावड यात्रेदरम्यान शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी मानव सेवा सामाजिक आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक, पिंजरच्या जवानांनी गांधीग्राम येथील पूर्णा नदीपात्रात रात्रभर खडा पहारा देत जिवरक्षक सेवा बजावली.

रविवार, 30 ऑगस्ट रोजी कावडधारी शिवभक्त मोठ्या संख्येने नदीपात्राकडे येत असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाने विशेष दक्षता घेतली. नदीपात्रात तसेच परिसरात जवानांनी रात्रभर गस्त घालत शिवभक्तांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवले.

ही सेवा अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्या आदेशानुसार, तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, अकोला तहसीलदार कुणाल झाल्टे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पथक प्रमुख दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वाखाली शेखर केवट, निलेश खंडारे, शाम घोंगे, विष्णू केवट, प्रतीक बोरसे, अश्विन केवट, हर्षल वानखडे आणि अमित जवके यांनी या जिवरक्षक सेवेत सहभाग घेतला.
दरम्यान, दहीहांडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह महसूल विभागातील मंडळ अधिकारी हरिहर निमकंडे, मंडळ अधिकारी श्रवण भराडी आणि विजय अधिकारी प्रशांत सायरे यांच्या पथकाचेही आपत्ती व्यवस्थापन जवानांना मोलाचे सहकार्य लाभले.
कावड यात्रेदरम्यान नदीपात्रात भाविकांची गर्दी वाढत असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनासोबत आपत्ती व्यवस्थापन पथकाने घेतलेली ही खबरदारी महत्त्वपूर्ण ठरली. याबाबतची माहिती नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागातील शुद्धोधन पोहरकार यांनी दिली.







