नवीन भांडी व देवाच्या मूर्ती देण्याचे दाखविले होते आमिष
पातूर प्रतिनिधी : पातूर शहरातील विविध गल्ली-बोळात फिरणाऱ्या काही महिलांनी जुन्या भांड्यांच्या बदल्यात नवीन भांडी तसेच देवाच्या नवीन मूर्ती बनवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे.विशेष म्हणजे संबंधित महिलांनी काही घरांमधून तांबे शव,पितळी भांडे,जर्मन,स्टील ची भांडीही घेऊन गेल्याचे सांगण्यात येत आहे.भांडी घेऊन गेलेल्या महिला अद्याप परत न आल्याने संबंधित कुटुंबांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
आठ दिवसांपूर्वी काही महिला पातूर शहरातील विविध परिसरात फिरत होत्या.घरातील महिलांशी संपर्क साधून जुन्या भांड्यांच्या बदल्यात त्याच प्रकारची नवीन भांडी तयार करून देण्याचे आश्वासन देण्यात आले.तसेच देवाच्या नवीन मूर्ती बनवून देण्याचेही आमिष दाखविण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या आश्वासनावर विश्वास ठेवून काही महिलांनी आपल्या घरातील जुनी जर्मन,स्टील,तांबे व पितळेची भांडी संबंधित महिलांच्या स्वाधीन केली.मात्र,भांडी घेऊन गेलेल्या महिला पुन्हा परत न आल्याने या प्रकाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे.या सात ते आठ महीलांची टोळी पातुरात दोघी दोघी गल्ली बोळात परीसरात फिरतांना नागरीकांना दिसल्याचे बोलल्या जात आहे.संबंधित महिलांचा ठावठिकाणा अद्याप स्पष्ट झालेला नसल्याने हा प्रकार नेमका काय आहे,याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.
अनोळखी व्यक्तींना घरातील वस्तू देऊ नका
अशा प्रकारे भांडी,मौल्यवान वस्तू किंवा इतर साहित्य घेऊन जाणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर नागरिकांनी सहज विश्वास ठेवू नये. महिलांनी विशेषतः सतर्क राहून अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देणे टाळावे,तसेच कोणत्याही वस्तू देण्यापूर्वी त्यांची ओळख व विश्वासार्हता तपासावी,असे आवाहन करण्यात येत आहे.पोलिसांकडून चौकशीची मागणी
फोटोतील महिला अथवा त्यांच्यासोबत अशाच पद्धतीने फिरणाऱ्या व्यक्ती परिसरात आढळल्यास नागरिकांनी स्वतःहून कोणतीही कारवाई न करता तातडीने पातूर पोलिसांना माहिती द्यावी.संबंधित महिलांनी नेमक्या किती नागरिकांकडून भांडी घेतली,भांडी घेण्यामागील उद्देश काय होता आणि त्या पुन्हा परत का आल्या नाहीत,याची पोलिसांनी चौकशी करावी,अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान,या प्रकरणाची अधिकृत सत्यता पोलिसांच्या चौकशीनंतरच स्पष्ट होणार असून,नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






