पातूर : पातूर ते भंडारज मार्गावर विद्युत काम करणाऱ्या अशोका बिल्डकॉम कंपनीच्या साहित्याला चोरट्यांनी वारंवार लक्ष्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. एकाच कंपनीच्या कामाच्या परिसरात तब्बल तीन वेळा तार चोरी झाल्याचे तक्रारींमधून समोर आले असून, या तीनही घटनांमध्ये मिळून तब्बल १० लाख ६२ हजार रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला गेल्याचे सांगण्यात आले आहे.
अशोका बिल्डकॉम कंपनीच्या वतीने अभिषेक जगदेव पवार यांनी पातूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत. पातूर, भंडारज, शिर्ला आणि बाभूळगाव परिसरात कंपनीचे विद्युत काम सुरू असून, कामासाठी उभारण्यात आलेल्या विद्युत वाहिनीवरील तार चोरट्यांकडून लंपास करण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
२८ जुलैला अडीच लाखांची तार चोरी
२८ जुलै २०२६ रोजी पातूर–भंडारज रोडवरील विद्युत कामाच्या ठिकाणी रात्री अंदाजे १२ ते पहाटे ५ वाजेदरम्यान चोरी झाली. या घटनेत १६ गाळे, सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील आणि अंदाजे ५ क्विंटल वजनाची तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या साहित्याची किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
१५ सप्टेंबरला पुन्हा मोठी चोरी; ६ लाख ७२ हजारांचे नुकसान
त्यानंतर १५ सप्टेंबर २०२६ रोजी याच परिसरात आणखी मोठी चोरी झाल्याचे समोर आले. बाभूळगावसमोरील तांदळी रोड ते भंडारज परिसरातील ३२ गाळ्यांवरील दोन इंची विद्युत तार चोरट्यांनी लंपास केली. या साहित्याची किंमत तब्बल ६ लाख ७२ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याच घटनेदरम्यान रात्रीच्या सुमारास संशयित चोरटे चारचाकी वाहनातून चोरीच्या ठिकाणी आल्याचे निदर्शनास आले. परिसरातील नागरिकांना संशय आल्याने चोरटे वाहनासह वेगाने पसार झाले. त्यामुळे वाहनाचा क्रमांक मिळू शकला नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तीन घटनांत १० लाख ६२ हजारांचा फटका
एकाच कंपनीच्या कामाच्या ठिकाणी तीन वेळा चोरी झाल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तिन्ही चोरीच्या घटनांमध्ये मिळून अंदाजे १० लाख ६२ हजार रुपयांचे विद्युत साहित्य चोरीला गेल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे.
वारंवार होणाऱ्या या चोरीच्या घटनांमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, या चोरीच्या घटनांमध्ये एकच टोळी सक्रिय आहे का, चोरीचा माल कुठे विकला जात आहे आणि या घटनांमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.
पातूर पोलिसांनी या तिन्ही चोरीच्या घटनांचा एकत्रित तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि चोरी गेलेले विद्युत साहित्य हस्तगत करावे, अशी मागणी कंपनीच्या वतीने करण्यात आली आहे.
वारंवार तार चोरीमुळे पातूर–भंडारज परिसरात खळबळ
एकाच कंपनीला तीन वेळा लक्ष्य करून लाखो रुपयांचे साहित्य लंपास झाल्याने पातूर–भंडारज मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता या सलग चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






