पारंपरिक वेशभूषेत महिला-कुमारीकांची उपस्थिती
पातूर प्रतिनिधी
पातूर तालुक्यातील बोडखा तांड्यावर बंजारा समाजाचा पारंपरिक तीज उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात, आनंदात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. रविवारी, दि. 6 सप्टेंबर रोजी सेवालाल महाराज मंदिर परिसरातून तीज विसर्जनाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. बंजारा गीतांच्या तालावर आणि डफडीच्या गजरात संपूर्ण तांडा भक्तिमय व उत्साहाच्या वातावरणाने दुमदुमून गेला.सेवालाल महाराज येथे पारंपरिक पद्धतीने तीज उत्सव साजरा केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत महिला व कुमारीका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.यावेळी बंजारा गीतांचे गायन करत महिलांनी आणि कुमारीकांनी तीज उत्सवाचा आनंद द्विगुणीत केला. मिरवणुकीदरम्यान डफडीच्या तालावर बंजारा समाजाचे नायक कारभारी यांनी ठेका धरत उत्साहात सहभाग नोंदविला.पारंपरिक गीत-संगीत, ढोल-डफडीचा गजर आणि समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभाग यामुळे भेंडीमहाल तांड्यावर उत्सवाचे चैतन्य निर्माण झाले होते.मंदिर परिसरातून निघालेली ही मिरवणूक बोडखाच्या मुख्य मार्गाने मार्गक्रमण करत सुवर्णा नदीवर पोहोचली. तेथे धार्मिक विधी व पारंपरिक पद्धतीने तीजचे विसर्जन करण्यात आले. बंजारा समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविणाऱ्या या तीज उत्सवात समाजबांधवांसह महिला व तरुणींची लक्षणीय उपस्थिती होती. पारंपरिक संस्कृतीचे जतन आणि नव्या पिढीपर्यंत बंजारा समाजाच्या रूढी-परंपरा पोहोचविण्याच्या दृष्टीने या उत्सवाला विशेष महत्त्व असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी बोडखा तांड्याचे नायक राजू राठोड, कारभारी बोदीराम चव्हाण, इत्यादींनी पुढाकार घेतला.







