धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही नागरिकांची पाण्यासाठी वणवण; पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर उपस्थित केले प्रश्न
पातूर, जि. अकोला : पातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोर्णा धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असतानाही शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सचिन मीरा समाधानजी ढोणे यांनी केला आहे. पाण्यासारख्या मूलभूत गरजेसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांनी नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
धरणात पाणी, मग नळाला ठणठणाट का?
मोर्णा धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही पातूर शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत ढोणे यांनी पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. योग्य नियोजन आणि प्रभावी व्यवस्थापन केल्यास नागरिकांना दर पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा करणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नगरपालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका
शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे ही नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याची टीका ढोणे यांनी केली. पाणीपुरवठ्याचे योग्य वेळापत्रक, उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
जनतेच्या संयमाचा अंत होऊ देऊ नका!
पाण्याच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे नमूद करत ढोणे यांनी लोकप्रतिनिधी आणि नगरपालिका प्रशासनाने जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी केली. नागरिकांना पाण्यासाठी वारंवार त्रास सहन करावा लागत असेल, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी म्हटले.
पाणीपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास पातूरकरांच्या वतीने रस्त्यावर उतरून जाब विचारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. आता नगरपालिका प्रशासन या आरोपांची दखल घेऊन पाणीपुरवठ्याबाबत कोणत्या उपाययोजना करते, याकडे पातूरकरांचे लक्ष लागले आहे.
— सचिन मीरा समाधानजी ढोणे
जिल्हा सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा






