जानवी व अनुषचा प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड
पातूर प्रतिनिधी :
जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत पातूर येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पै.जानवी अनिल श्रीनाथ आणि पै.अनुष अनिल श्रीनाथ या बहीण-भावाने १७ वर्षांखालील वयोगटात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.या कामगिरीमुळे दोघांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्रतिकूल परिस्थितीतही दोघांनी नियमित सराव व मेहनतीच्या जोरावर कुस्ती क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.लहानपणापासून श्री सिदाजी व्यायामशाळेत वस्ताद पै.अक्षय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मल्लविद्येचे प्रशिक्षण घेतले.या उल्लेखनीय यशाबद्दल पातूर तालुका विकास मंचाचे संयोजक डॉ.शिवकुमारसिंह बैस आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पातूर विभागाचे प्रमुख धारकरी विजय राऊत यांच्या हस्ते जानवी व अनुष यांचा पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी हभप लक्ष्मणराव बारताशे,दिलीपसिंह बायस,सुहास देवकर,निलेश गाडगे,किरण राखोंडे,प्रमोद श्रीनाथ,जीवन राऊत, चैतन्य राऊत,विठ्ठल डिके,शिवा निमकंडे,अविनाश बायस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.जानवी व अनुष यांच्या यशाबद्दल पातूर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून,त्यांच्या आगामी विभागीय स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमींकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.







