झरंडीच्या महिलांनी एकजुटीने केले दारूचे अड्डे उद्ध्वस्त
पातूर : वाढत्या अवैध दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील झरंडी येथील महिलांनी अखेर एकजूट दाखवत दारूविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्या नेतृत्व महिलांनी पुढाकार घेऊन बुधवारी ९ सप्टेंबर रोजीच्या सकाळी गावातील अवैध दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले.

दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांमध्ये कौटुंबिक कलह, भांडणे आणि आर्थिक अडचणी निर्माण होत असून, लहान मुलेही व्यसनाच्या वातावरणाच्या संपर्कात येत असल्याची चिंता महिलांनी व्यक्त केली. व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त होण्याचे प्रकार वाढत असल्याने गाव दारूमुक्त करण्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला.

या मोहिमेत मंगलाबाई हांडे, बेबीबाई ठाकरे, संगिता पांडे, फुलाबाई हांडे, सुंदाबाई हांडे, पद्मिनीबाई ठाकरे, परबाबाई चवारे, कल्पनाबाई लताड, इंदूबाई शिंदे, लीलाबाई कांडकर, वंदना लताड, नादबाई पांडे यांच्यासह सुभाष राठोड, विक्रम जाधव, अनिल ठाकरे व ग्रामस्थ सहभागी झाले.दारूमुक्त झरंडी, सुरक्षित कुटुंब आणि उज्ज्वल भविष्य, असा निर्धार महिलांनी व्यक्त केला आहे.

दारू बनवण्यासाठी विषचा वापर !
महिलांनी गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले असता,त्या ठिकाणी शेतात पिकांसाठी फवारणी करिता उपयोगी विषच्या काही बाटल्या आढळून आल्या, दारू बनवण्यासाठी विषचा वापर करून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या गंभीर प्रकाराकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे.







