पातूर : पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बोडखा येथे चार बकऱ्या, भंडाराज येथे तीन बकऱ्या तर कापशी येथे पाच बकऱ्यांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे.यासोबतच परिसरातील तब्बल सात शेतकऱ्यांची केबल वायर चोरीला गेल्याने चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याचे चित्र आहे.
ऑगस्ट महिन्यात बकरी चोरीची ही चौथी घटना असल्याचे सांगण्यात येत असून,वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पशुपालक आणि शेतकरी चिंतेत आहेत.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार असलेल्या शेळ्या-बकऱ्यांची चोरी होत असल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
दरम्यान,शेतातील विद्युत पंपांसाठी वापरण्यात येणाऱ्या केबल वायरचीही चोरी होत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास शेतकरी धजावत नसून,आपल्या मालमत्तेच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना चोरट्यांवर पोलिसांचा वचक राहिला आहे का,असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.या घटनांमुळे पातूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून,चोरीच्या घटनांचा तपास करून चोरट्यांना तातडीने जेरबंद करण्याची मागणी शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.पोलिस प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन रात्रीचीगस्त वाढवावी,संशयितांवर नजर ठेवावी तसेच चोरीच्या घटनांचा छडा लावून शेतकरी व नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास द्यावा,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे “शेतकरी आणि नागरिक सुरक्षित आहेत का?” हा प्रश्न सध्या पातूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.







