पातूर : तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पातूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव-२०२६ प्रसिद्धीअभावी चर्चेचा विषय ठरला असून, महोत्सवाबाबत तालुक्यातील बहुतांश शेतकरी व नागरिकांना माहितीच मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पातूर तालुका हा विविध पारंपरिक व पौष्टिक रानभाज्यांसाठी ओळखला जातो. रानभाज्यांचे आरोग्यदायी गुणधर्म, पौष्टिक महत्त्व तसेच त्यातून शेतकरी आणि महिला बचत गटांना मिळणाऱ्या आर्थिक संधी याबाबत जनजागृती करणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश होता. मात्र, या महोत्सवाची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
महोत्सवाची माहिती गावागावातील शेतकरी, महिला बचत गट, नागरिक आणि रानभाजी उत्पादकांपर्यंत पोहोचविण्याऐवजी आत्मा समितीच्या माध्यमातून जवळच्या काही महिला बचत गट व शेतकरी गटांना बोलावून कार्यक्रम उरकण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे रानभाज्यांची लागवड, प्रक्रिया, विक्री आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याबाबत व्यापक जनजागृती करण्याची संधी हुकल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, कार्यक्रमात आत्मा समितीच्या अध्यक्षांचा मानपान करून कार्यक्रमाचा विषय संपविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे बोलले जात आहे. शासनाकडून जनजागृतीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांचा लाभ सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना मिळणे अपेक्षित असताना, केवळ औपचारिकता म्हणून कार्यक्रम घेण्यात आल्यास त्याचा उद्देशच निष्फळ ठरतो, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
रानभाज्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पातूर तालुक्यातच रानभाजी महोत्सवाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, ही बाब गंभीर असून संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.







