पातुर प्रतिनिधी : महावितरणकडून बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचा आरोप करीत पातुर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ च्या नगरसेविका सौ. शितल प्रवीण पोहरे यांच्या नेतृत्वात महिलांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. यावेळी नागरिकांच्या वाढीव वीजबिलांबाबतचे निवेदन महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.
प्रभाग क्रमांक १ मधील अनेक नागरिकांना अपेक्षेपेक्षा जास्त वीजबिले येत असल्याने सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक भार पडत असल्याची तक्रार महिलांनी केली. तसेच जुने मीटर काढून बसविण्यात आलेल्या डिजिटल स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत नागरिकांमध्ये शंका असून, या मीटरमुळे वीजबिलात वाढ होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

यावेळी प्रभाग क्रमांक १ मध्ये स्मार्ट मीटर बसविताना भेदभाव करण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. नागरिकांच्या मागणीनुसार स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवावेत, वाढीव वीजबिलांची तातडीने तपासणी करावी, मीटरमध्ये दोष आढळल्यास ते बदलण्यात यावेत तसेच मीटर रीडिंग व बिल आकारणी प्रक्रियेबाबत पारदर्शक माहिती देण्यात यावी, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महिलांनी दिला. या आंदोलनात अनिता किरतकार, अस्मिता डोंगरे, पंचफुला डोंगरे, रूखमनबाई शेगोकार, सविता बावस्कार, सुशीला शेगोकार, जिजा सुरवाडे, रेखा कोरडे, मंदा शेगोकार, मैना ठोबरे, कमला इंगळे, चंद्रकला खंडारे, प्रतिभाबाई इंगळे, प्रवीण पोहरे, राजेंद्र पोहरे, मंगेश डोंगरे, प्रवीण बोरकर, योगेश पोहरे, बालूभाऊ सुरवाडे, सनी पोहरे व योगेश डोंगरे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिक सहभागी झाले होते.







