पातूर : पातूर-वाशिम महामार्गावरील बोडखा गावाजवळील राजस्थानी धाब्याच्या परिसरात रात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी वाहनातून प्रवास करीत होते. हे प्रवासी अजमेरकडे जात असल्याची प्राथमिक माहिती असून अपघातात जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नसून संबंधित यंत्रणेकडून अधिक माहिती घेतली जात आहे.दरम्यान, अपघातग्रस्त वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
महामार्गावरील ट्रक पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
बोडखा गावाजवळील या राजस्थानी धाब्याच्या परिसरात महामार्गाच्या कडेला तसेच रस्त्यालगत मोठ्या संख्येने ट्रक उभे केले जात असल्याने वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून केली जात आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.या ठिकाणी महामार्गावर होणारी अनधिकृत किंवा अडथळा निर्माण करणारी वाहन पार्किंग व्यवस्था तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी संबंधित विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.या अपघातातील मृत व्यक्ती व जखमींची नावे तसेच अपघाताचे नेमके कारण अधिकृत तपासानंतर स्पष्ट होणार आहे.







