पातूर : पातूर शहरातील आठवडी बाजाराच्या दिवशी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी नागरिकांच्या महागड्या मोबाईलवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. एकाच दिवशी तब्बल सहा ते सात नागरिकांचे मोबाईल चोरीला गेल्याची चर्चा असून, या प्रकारामुळे आठवडी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना चोरट्यांनी नागरिकांच्या गर्दीचा फायदा घेत मोबाईल लंपास केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे मोबाईल चोरीला गेल्यानंतरही संबंधित नागरिकांकडून ‘मोबाईल हरविल्याची’ तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांची अधिकृत संख्या आणि प्रत्यक्षात चोरीला गेलेल्या मोबाईलची संख्या यामध्ये फरक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, आठवडी बाजाराच्या दिवशी पातूर पोलिसांकडून योग्य आणि प्रभावी गस्त ठेवण्यात आली असती, तर अशा प्रकारच्या घटना रोखता आल्या असत्या, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. बाजार परिसरात पोलिसांची उपस्थिती आणि संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवण्याची यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मोबाईल चोरीच्या या घटनांना काही दिवस उलटूनही अद्याप कोणत्याही संशयित आरोपीचा शोध लागलेला नसल्याने पोलिसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. बाजारपेठेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
आठवडी बाजारातील नागरिकांची सुरक्षा आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पातूर पोलिसांनी विशेष मोहीम राबवून चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.






