अकोला : अकोला जिल्ह्याच्या राजकारणात भाजप आणि शिवसेना यांच्यात सोशल मीडियावरून आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वर्गीय आमदार गोवर्धन शर्मा यांच्या कार्याचा गौरव, राजेश्वर मंदिराच्या विकासकामांचे श्रेय आणि भाजपच्या २५ वर्षांच्या सत्तेतील विकासकामांचा हिशेब या मुद्द्यांवरून राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे.
भाजप महिला आघाडीच्या महानगर अध्यक्ष वैशालीताई शेळके यांनी आमदार नितीन देशमुख यांच्यावर टीका करत स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्या कार्याचा अपमान करू नये, अशी भूमिका मांडली. राजेश्वर मंदिराला ‘क’ आणि ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी पाठपुरावा केल्याचा दावाही त्यांनी केला.
मात्र, या टीकेला शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हासंघटिका सौ. सरिताताई वाकोडे यांनी सोशल मीडियावरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केवळ स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्याबद्दल आदर व्यक्त करून चालणार नाही, तर भाजपने त्यांच्या राजकीय योगदानाचा सन्मान प्रत्यक्ष कृतीतून का दाखवला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
गोवर्धन शर्मा यांच्या मुलाला उमेदवारी का नाकारली?
सरिताताई वाकोडे यांनी भाजप नेतृत्वाला थेट प्रश्न विचारताना म्हटले आहे की, स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांनी आयुष्यभर पक्षासाठी काम केले, मग त्यांच्या मुलाला कृष्णा शर्मा यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी का देण्यात आली नाही? गोवर्धन शर्मा यांच्याबद्दल एवढा आदर असेल तर त्यांच्या कुटुंबाला राजकीय न्याय का मिळाला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपमधील निष्ठावंतांवर अन्याय झाल्याचा आरोप
भाजपच्या जिल्ह्यातील जुन्या वाटचालीचा उल्लेख करताना सरिताताई वाकोडे यांनी तेजराव थोरात यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. पक्ष वाढवण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली, त्यांनाच पुढे डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. २०१४ मध्ये अकोला पूर्व मतदारसंघाच्या उमेदवारीवरूनही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
२५ वर्षे सत्ता, तरी अकोल्याच्या विकासाचा प्रश्न कायम!
सरिताताई वाकोडे यांनी भाजपच्या सत्ताकाळातील विकासकामांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अकोला शहराला २५ वर्षांच्या सत्तेनंतरही स्वच्छ पाणी, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि मोठे उद्योग का मिळाले नाहीत? जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी काय प्रयत्न झाले? असा सवाल त्यांनी केला आहे.
कॉटनसिटी म्हणून ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यात कापूस आधारित मोठा उद्योग उभारण्याची गरज आहे. तसेच बंद पडलेला दुग्धव्यवसाय पुन्हा सुरू करणे, वाढत्या शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे आणि बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
२०२९ मध्ये जनतेच्या मतदानातून उत्तर मिळेल!
भाजपच्या नेत्यांनी इतरांवर टीका करण्याआधी स्वतःच्या सत्ताकाळातील कामांचा आढावा घ्यावा, असा टोला सरिताताई वाकोडे यांनी लगावला आहे. २०२९ च्या निवडणुकीत अकोल्यातील जनता मतदानातून उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून दिला आहे.
राजकीय संघर्षाला नवे वळण
एकीकडे भाजपकडून स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांच्या कार्याचा आणि राजेश्वर मंदिराच्या विकासकामांचा इतिहास मांडला जात आहे, तर दुसरीकडे शिवसेनेकडून भाजपच्या सत्ताकाळातील विकासकामे, निष्ठावंत कार्यकर्त्यांवरील कथित अन्याय आणि उमेदवारीच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या संपूर्ण वादात सरिताताई वाकोडे यांनी उपस्थित केलेले प्रश्न आता अकोल्याच्या राजकीय चर्चेचा विषय ठरत आहेत. भाजप या प्रश्नांना काय उत्तर देणार आणि हा सोशल मीडिया संघर्ष पुढे कोणते वळण घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






