न्यायाधीशांनी गिरविले बाल हक्काचे धडे!
पातूर : विद्यार्थ्यांचे बालपण सुरक्षित व्हावे, त्यांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी आणि कायद्याविषयी योग्य समज निर्माण व्हावी, या उद्देशाने पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलमध्ये ‘सुरक्षित बचपन’ अभियानांतर्गत कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पातूर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बालहक्क, बालवयातील घ्यावयाची काळजी, कायद्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘सुरक्षित बचपन’ अभियानाच्या अनुषंगाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष संदीप मोरे होते. प्रमुख वक्ते म्हणून सरकारी अभियोक्ता विश्वंभर गरड, ॲड. दिनेश काळपांडे आणि गटशिक्षणाधिकारी प्रवीण डाबेराव उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे, विस्तार अधिकारी गौतम बडवे, विषयतज्ज्ञ संतोष राठोड, विधिज्ञ संघ पातूरचे अध्यक्ष ॲड. किरण सरदार, ॲड. रुपाली राऊत आणि ॲड. काजी साहेब यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बालवयात घ्यावयाची काळजी, स्वतःच्या सुरक्षिततेबाबत सतर्कता, बालहक्कांचे संरक्षण आणि अमली पदार्थांपासून दूर राहण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात न्यायाधीश संदीप मोरे यांनी विद्यार्थ्यांना सोप्या आणि समजेल अशा भाषेत कायद्याचे महत्त्व स्पष्ट केले. बालवयात नकळत घडणाऱ्या चुकीच्या कृती टाळण्यासाठी आवश्यक असलेली दक्षता, कायद्याचे पालन, योग्य-अयोग्य यातील फरक ओळखण्याची क्षमता आणि जबाबदार नागरिक म्हणून वागण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी जागरूक राहून योग्य मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे यांनी केले, तर विद्यार्थिनी अक्षरा शेंडे हिने आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किड्स पॅराडाईज स्कूलचे बजरंग भुजबळराव, अविनाश पाटील, नीतू ढोणे, अक्षय तायडे, हरीष सौंदडे, नरेंद्र बोरकर, स्मितल उगले, प्रियंका चव्हाण, शुभांगी बोरकर, यश गवई आणि कल्पना वानरे यांनी परिश्रम घेतले. तसेच पातूर तालुका विधी सेवा समितीचे कर्मचारी वैभव इंगोले, संजय बुडाळकर, संदीप चव्हाण आणि विधी स्वयंसेवक संघाचे पंकज वालोकार, गणेश पोपळघट, पंकज पोहरे व अविनाश पोहरे यांनी सहकार्य केले.






