पुरवठा निरीक्षक कार्यालयात गैरहजर
मोबाईलवरही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार! रेशन तांदळाच्या कथित तस्करीकडे दुर्लक्ष?
पातूर प्रतिनिधी : पातूर तालुका पुरवठा विभागाच्या कारभाराबाबत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तालुका पुरवठा निरीक्षक श्रीमती शितल मोरखडे (दांदळे) या नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.त्यामुळे विविध शासकीय कामांसाठी पुरवठा कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागत असून प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे,पुरवठा निरीक्षक श्रीमती शितल मोरखडे (दांदळे) यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचीही तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.कार्यालयात अधिकारी उपलब्ध नाहीत आणि मोबाईलवर संपर्क साधला तरी प्रतिसाद मिळत नाही,अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या समस्या मांडायच्या तरी कोणाकडे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकीकडे नागरिकांना रेशनकार्ड,धान्य वितरण तसेच इतर शासकीय कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत,तर दुसरीकडे पातूर तालुक्यात रेशन धान्याच्या काळाबाजाराचा प्रश्न गंभीर होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
तालुक्यातील काही ठिकाणी स्वस्त धान्य दुकानांमधून मिळणाऱ्या तांदळाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक व तस्करी होत असल्याचे आरोप केले जात आहेत.या कथित प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पुरवठा विभागाची असतांना या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली जात आहे का,असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
सर्वसामान्यांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला कोणाचा?
शासनाकडून गरीब व गरजू कुटुंबांसाठी वितरित करण्यात येणारे रेशनचे धान्य लाभार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचणे आवश्यक आहे.मात्र, धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी खऱ्या असतील तर हा प्रकार अत्यंत गंभीर असून त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी अकोला यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पातूर पुरवठा कार्यालयाची अचानक तपासणी करावी. पुरवठा निरीक्षकांच्या कार्यालयीन उपस्थितीची चौकशी करावी.तसेच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करून धान्याची आवक-जावक, साठा आणि वितरणाची पडताळणी करावी,अशी मागणी होत आहे.
कार्यालयात अधिकारी मिळत नाहीत, मोबाईलवर संपर्क केला तरी प्रतिसाद मिळत नाही आणि दुसरीकडे रेशन धान्याच्या कथित तस्करीच्या तक्रारी समोर येत आहेत.मग सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे? आता जिल्हा प्रशासन या गंभीर तक्रारींची दखल घेऊन पुरवठा विभागाच्या कारभाराची चौकशी करणार का? कथित धान्य तस्करीमागील सत्य बाहेर आणणार का? आणि नागरिकांना कार्यालयात नियमित सेवा मिळण्यासाठी ठोस पावले उचलणार का,याकडे संपूर्ण पातूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.







