पातूर प्रतिनिधी :
डॉ.वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय,पातूर येथे आयोजित “उमंग” या सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना जीवन कसे जगावे,अपयशाशी कसे लढावे आणि स्वतःची वेगळी ओळख कशी निर्माण करावी,याबाबत मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास माजी महिला अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सदस्य आशाताई मिरगे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले की, जीवनात कधीही इतरांशी तुलना करू नये.प्रत्येक व्यक्तीची जागा वेगळी असते.आपल्याला जे योग्य वाटते,ते प्रामाणिकपणे करणे महत्त्वाचे आहे.तुलनात्मक धोरणामुळे जीवनात असमाधान निर्माण होते,असे त्यांनी स्पष्ट केले.दुसरे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ.हर्षवर्धन मालोकार यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणी सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.जीवनात अपयश आले तरी खचून जाऊ नका.सातत्याने मेहनत केल्यास यश निश्चित मिळते.कष्ट करण्याची तयारी ठेवली तर संपूर्ण जग आपल्या हातात येऊ शकते,असे त्यांनी नमूद केले.यावेळी प्रा.ममता ताई इंगोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,फक्त गुण मिळवणे म्हणजे यश नव्हे.जीवनात आपुलकी,मैत्री आणि संवाद खूप महत्त्वाचा आहे.प्रत्येक विद्यार्थ्याने एक विश्वासू मित्र ठेवावा.कितीही अपयश आले तरी नैराश्याला बळी पडू नये किंवा आत्महत्येसारखा विचार कधीही करू नये,असे भावनिक आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण महाविद्यालयाचे संचालक डॉ.साजिद शेख यांनी केले.आयुर्वेद हे केवळ प्रोफेशन न मानता फॅशन म्हणून स्वीकारावे.रुग्णसेवा हीच खरी साधना आहे.हुशार डॉक्टरपेक्षा शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि संवेदनशील डॉक्टर समाजाला अधिक आवश्यक आहे.पालकांनी आपल्या शिक्षणासाठी खर्च केलेला पैसा नसून ते त्यांचे स्वप्न आहे.ते स्वप्न पूर्ण करणे हेच विद्यार्थ्यांचे खरे कर्तव्य आहे,असे त्यांनी प्रतिपादन केले.या कार्यक्रमास प्राचार्या डॉ.जयश्री काटोले, उपप्राचार्य डॉ.अभय भोसकडे,जनसंपर्क अधिकारी धनंजय मिश्रा,डॉ.सोनाली महाजन तसेच विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रणव महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी,शिक्षकेतर कर्मचारी व रुग्णालयीन कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.संपूर्ण कार्यक्रमात आनंद,संस्कृती आणि प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.





