महाराष्ट्रातून महापारेषणच्या चार कर्मचाऱ्याची निवड
पातूर प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या केंद्रीय ऊर्जा प्राधिकरणच्या पुढाकाराने आयोजित राष्ट्रीय लाईनमन दिवस हा राष्ट्रीय महोत्सव नुकताच नवी दिल्ली येथे पार पडला.या सोहळ्यात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्रातून चार प्रतिनिधीची निवड करण्यात आली होती.यामध्ये अमरावती परिमंडळातून अकोला सर्कलच्या अकोला विभागातून गोपाल गाडगे यांची निवड करण्यात आली होती.यावेळी त्यांना केंद्रीय ऊर्जा मंत्री यांच्या उपस्थितीत पदक बहाल करीत सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.गोपाल गाडगे हे अमरावती परिमंडळ अंतर्गत येत असलेल्या अकोला सर्कल मधील अकोला विभागाच्या 220 के.व्ही.उपकेंद्र,मालेगाव (झोडगा) येथे उपमुख्य तंत्रज्ञ् म्हणून कार्यरत आहेत.महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी अमरावती परिमंडळाला मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वीज अधिकारी,कर्मचारी व लाईनमन यांचा राष्ट्रीय लाईनमन दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावर सन्मान केला जातो.या राष्ट्रीय सोहळ्यात संपूर्ण भारतातील प्रत्येक राज्यातून विशेष कामगिरी करणाऱ्या 150 वीज कर्मचाऱ्याना निमंत्रित करण्यात आले होते. यावर्षी पहिल्यांदाच महापारेषणच्या कर्मचाऱ्यांची नोंद या राष्ट्रीय सोहळ्यासाठी झाली असून यासाठी छत्रपती संभाजी नगर झोनमधून अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय नलबलवार, वाशी झोनमधून प्रमुख कार्यदेशक किशोर भानुशाली,अमरावती झोनमधून उपमुख्य तंत्रज्ञ् गोपाल गाडगे,नागपूर झोनमधून तंत्रज्ञ् -२ किसन नगरकर आदींची निवड करण्यात आली होती.नवी दिल्ली येथील स्टाईन ऑडिटोरियम,इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे हा राष्ट्रीय सन्मान सोहळा थाटात पार पडला.या सोहळ्यात केंद्रीय ऊर्जा व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या विशेष उपस्थितीत व केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद,भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाचे सचिव पंकज अग्रवाल,टाटा पावरचे कार्यकारी संचालक ब्रिजदास प्रसाद आदी मान्यवरांच्या हस्ते पदक बहाल करीत सन्मानपत्र देऊन महापारेषणचे गोपाल गाडगे व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी सिने अभिनेता अन्नू कपूर यांनी उपस्थित वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता संजीव भोळे साहेब,अधीक्षक अभियंता संजय काटकर साहेब,सहाय्यक महाव्यवस्थापक विशाल वाघमारे साहेब,कार्यकारी अभियंता विनोद हंबर्डे साहेब,व्यवस्थापक स्वानंद टोपले साहेब, प्रमुख लिपिक विलास आकोडे साहेब आदींनी गोपाल गाडगे यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले.त्यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.





