अकोला (प्रतिनिधी) – अकोला पोलिस अधीक्षक कार्यालयाने डिजिटल सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात मानाचा तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स विशेष मोहिमेत ही उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत राज्यातील विविध शासकीय कार्यालयांचे सात प्रमुख निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये कार्यालयाची संकेतस्थळ व्यवस्था, ई-ऑफिसचा वापर, डॅशबोर्ड प्रणाली, व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर तसेच GIS प्रणालीचा समावेश होता. या सर्व घटकांमध्ये अकोला पोलिसांनी प्रभावी कामगिरी नोंदवली.

या यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिस विभागाने डिजिटल उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली.
या उपक्रमामुळे पोलिस दलाची कार्यक्षमता वाढण्यास मदत झाली असून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक व जलद सेवा मिळण्यास हातभार लागणार आहे. या यशात तांत्रिक सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचेही मोलाचे योगदान असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अकोला पोलिसांच्या या कामगिरीमुळे जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.







