पातूर (प्रतिनिधी) – पातूर शहराचे आराध्य दैवत संत श्री सिदाजी महाराज यांचा वार्षिक यात्रा महोत्सव दिनांक 28 मार्च रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने संपन्न झाला. या यात्रेमध्ये पंचक्रोशीतून हजारो भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.
यावर्षी यात्रेसाठी संस्थांकडून सुमारे 60 क्विंटल गव्हाचा आटा महाप्रसादासाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या दुप्पट असल्याचे दिसून आले, त्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
यात्रेनिमित्त बाळापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नितीन देशमुख यांनी संत श्री सिदाजी महाराजांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी सिदाजी महाराज पंचमंडळाच्या वतीने आमदार देशमुख यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यात्रेच्या यशस्वी आयोजनामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असून पातूर शहरात धार्मिक उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.







