पातूर प्रतिनिधी
बार्शिटाकळी पोलीस स्टेशन हद्दीतील मेधा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लि. च्या सोलार प्लांटमधून कॉपर केबल चोरीच्या प्रकरणाचा अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या १२ तासांत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दि. २८ मार्च २०२६ रोजी जळलाबाद (ता. बार्शिटाकळी) येथील मेधा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लि. च्या सोलार प्लांट इन्स्टॉलेशन गोदामातून अज्ञात चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात कॉपर केबलची चोरी केली होती. यामध्ये ९० स्क्वेअर एमएम क्षमतेच्या केबलचा मोठा ड्रम (किंमत अंदाजे ६.५० लाख रुपये) तसेच ४ स्क्वेअर एमएम क्षमतेच्या डी.सी. केबलचे लहान ड्रम (किंमत सुमारे २.२५ लाख रुपये) असा एकूण ८.७५ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. याबाबत बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान गोदामात काम करणारा संदीप उमेश राय (वय २७, रा. सरीपूर, जि. बक्सर, बिहार) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. चौकशीअंती त्याने चोरीची कबुली दिली.
त्याने चोरी केलेला माल शहजाद बेग सलीम बेग (वय ३२, रा. बादशाह नगर, पातूर) याला विकल्याचे उघड झाले. पोलिसांनी शहजाद बेग याच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ९० स्क्वेअर एमएम केबलचा मोठा ड्रम, डी.सी. केबलचे दोन लहान ड्रम तसेच काही उघडलेले ड्रम असा सुमारे ७.५० लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.
दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपास बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अजीत चांदक, अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.







