पातूर प्रतिनिधी
सध्या बाळापूर मतदारसंघात विविध पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई तीव्र होत असून, या संघर्षातून स्थानिक प्रशासनातील कामकाजावरही परिणाम होताना दिसत आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण, कृषी विभाग तसेच नगर परिषद कार्यालयांमध्ये निविदा मंजुरीवरून व कामाच्या तक्रारीवरून कंत्राटदार, कर्मचारी आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद-विवाद होत असल्याची माहिती समोर येत आहे.
या वादांचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर होत असून, अनेक ठिकाणी तक्रारी, आरोप-प्रत्यारोप आणि भानगडी वाढल्या आहेत. काही घटनांमध्ये तर वादाची परिणती थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याचेही समजते.
विशेष म्हणजे, या सगळ्या घडामोडींमध्ये एक वेगळाच सामाजिक ट्रेंड दिसून येत आहे. वादाच्या वेळी एकमेकांना उद्देशून “तो माझा बाप आहे”, “तू त्याला का बोलतोस” अशा शब्दांत वाद होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे प्रत्यक्ष जन्मदात्या वडिलांपेक्षा राजकीय ‘गॉडफादर’ किंवा प्रभावशाली सहकाऱ्याला ‘बाप’ मानण्याची प्रथा वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
या पार्श्वभूमीवर, “खरा बाप कोण?” असा प्रश्न उपस्थित करत चौकाचौकात नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. राजकारणातील वाढती गटबाजी, दबाव तंत्र आणि व्यक्तिपूजेमुळे सामाजिक मूल्यांवरही परिणाम होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
प्रशासनाने या वाढत्या तणावाकडे गांभीर्याने लक्ष देऊन निविदा प्रक्रियेत , विकास योजनेमध्ये पारदर्शकता आणावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही पुढे येत आहे.







