पातूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील शासकीय व निमशासकीय विभागांमध्ये सन २००५ नंतर तसेच दि. २७ ऑक्टोबर २००९ च्या शासन निर्णयानुसार सेवा भरती प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे नियुक्त झालेल्या पदवीधर व पदवीधरक अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘पदवीधर/पदवीधरक अंशकालीन शासकीय-निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन हक्क समिती, महाराष्ट्र प्रदेश’ यांच्या वतीने हे पहिले राज्यव्यापी अधिवेशन रविवारी, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नागपूर येथील सीताबर्डी चौकातील कमला नेहरू महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.
अधिवेशनाचे उद्घाटन माजी विधानसभा अध्यक्ष तथा विद्यमान आमदार नाना पटोले यांच्या हस्ते होणार असून, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत. मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री विजय वडेट्टीवार, डॉ. नितीन राऊत, राजेंद्र मुळक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समितीच्या प्रमुख मागण्यांमध्ये अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या अंशकालीन कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच इतर प्रलंबित प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, यांचा समावेश आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेवर न्यायालयाने शासनाला सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिवेशनात अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार असून, संघटनेच्या आगामी आंदोलनाची दिशा व कृती आराखडाही निश्चित करण्यात येणार आहे. राज्यभरातील विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, पदाधिकारी व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याध्यक्ष लतीफ पठाण, विदर्भ अध्यक्ष सुरेश कुमार राजूत, नागपूर जिल्हाध्यक्ष योगेश सावणे आणि राज्य सचिव नरेंद्र कर्णस यांनी केले आहे.






