पातूर, प्रतिनिधी : सोशल मीडियावर मुस्लिम धर्म,मुस्लिम समाज तसेच पैगंबर मोहम्मद साहेब आणि त्यांच्या पत्नी यांच्याविषयी कथितरित्या आक्षेपार्ह,अश्लील व समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,पातूर येथील जमात रजा ए मुस्तफा यांच्या वतीने ही तक्रार देण्यात आली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे,संबंधित महिला सोशल मीडियावर मुस्लिम धर्म,पैगंबर मोहम्मद साहेब तसेच त्यांच्या पत्नी यांच्याबाबत कथितरित्या खोटे,काल्पनिक आणि आक्षेपार्ह विधान करून व्हिडिओ प्रसारित करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार,या व्हिडिओंमुळे समाजात धार्मिक भावना दुखावल्या जात असून हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.तसेच समाजात तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.या प्रकरणाची चौकशी करून संबंधित महिलेविरुद्ध योग्य त्या कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल करावा तसेच एफआयआरची प्रत देण्यात यावी,अशी मागणी तक्रारदारांनी पातूर पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान,या तक्रारीची पोलीस प्रशासनाकडून पडताळणी व चौकशी सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





