हजारो भाविकांची उपस्थिती; १०० प्रशिक्षित आयुर्वेद डॉक्टरांकडून चरणसेवा, चहा-फराळाची व्यवस्था
पातुर, दि. २७ जून : संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पातुर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत भक्तिमय वातावरणात आगमन झाले.या पवित्र सोहळ्यानिमित्त डॉ.वंदनाताई जगन्नाथराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय,पातुर यांच्या वतीने पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले

“गण गण गणात बोते” च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.हजारो वारकरी,भाविक व नागरिकांनी श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला.महाविद्यालयाचे संचालक डॉ.सादिक शेख,प्राचार्य डॉ.अभय उसकुडे, डॉ.जयश्री काटोले,डॉ.मावळे आणि डॉ.पुंड यांनी पालखीचे पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण स्वागत केले.

उपस्थित मान्यवरांनी समाजात सुख,शांती,समृद्धी आणि सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे,अशी श्रींच्या चरणी प्रार्थना केली.यावर्षी महाविद्यालयाच्या वतीने एक आगळावेगळा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.पंचायत समिती,पातुर येथील पालखी मुक्कामस्थळी महाविद्यालयातील १०० प्रशिक्षित आयुर्वेद डॉक्टर व इंटर्न डॉक्टर यांची विशेष सेवा पथके पाठविण्यात आली.या डॉक्टरांनी हजारो वारकरी व भाविकांची चरणसेवा (पाय धुणे,स्वच्छता व सेवाभावाने सेवा) करून वारकरी संप्रदायाच्या सेवाधर्माची जपणूक केली.या उपक्रमाचे वारकरी व नागरिकांनी मनापासून कौतुक केले.तसेच महाविद्यालयाच्या वतीने सर्व भाविकांसाठी चहा, पिण्याचे शुद्ध पाणी व फराळाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती.हजारो भाविकांनी या सेवेचा लाभ घेत महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीचे आणि सेवाभावी वृत्तीचे कौतुक केले.पालखी सोहळ्यादरम्यान महाविद्यालयातील प्राध्यापक,डॉक्टर,कर्मचारी व विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सेवा बजावत भाविकांना आवश्यक ते सहकार्य केले.संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण,भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत निकम, दिलीप बगाडे,रमेश पोरे,शरद अवचार आणि वासुदेव राखुंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, डॉक्टर,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सेवाकार्यात सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाच्या यशात मोलाचे योगदान दिले.सामाजिक सेवा,आयुर्वेदाची आरोग्यपर परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा सेवाधर्म यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा पालखी स्वागत सोहळा भाविकांच्या कायम स्मरणात राहील,अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.





