प्रतिनिधी | पातूर
अकोला जिल्हा पोलिसांनी ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकामार्फत मोठी कारवाई करत पातूर तालुक्यातील चांणी पोलीस स्टेशन अंतर्गत जाम येथील शेतशिवारात सुरू असलेला अवैध हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत एक आरोपीला अटक करण्यात आली असून, एकूण १ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच संपूर्ण हातभट्टी साहित्य व गावठी दारू जागेवरच नष्ट करण्यात आली.
पोलिस अधीक्षक अविनाश चांडक यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेहकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पातूर तालुक्यातील जाम गावाजवळील शेतात छापा टाकला असता, एका इसमाकडून मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू तयार केली जात असल्याचे आढळून आले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी गणेश जनार्दन आंभोरे (वय ५२, रा. जाम, ता. पातूर, जि. अकोला) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७५० लिटर रसायन (किंमत १,२७,५०० रुपये) आणि ५० लिटर गावठी दारू (किंमत १०,००० रुपये) असा एकूण १,३७,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर संपूर्ण हातभट्टी साहित्य आणि तयार गावठी दारू जागेवरच नष्ट करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अविनाश चांदक, अपर पोलिस अधीक्षक व्ही. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेहकर, पोलिस उपनिरीक्षक माजिद पठाण तसेच अमलदार भास्कर धोत्रे, महेंद्र माळीये, रवी खंडारे, किशोर सोनोने, मंगेश इंगळे, रत्नील खेडेकर आणि उमेश दिवटे यांच्या पथकाने पार पाडली.
अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.





