स्वच्छता, सुशोभीकरण, एलईडी प्रकाशयोजना, सीसीटीव्ही, मुलांसाठी खेळणी व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करण्याची मागणी…
पातूर I प्रतिनिधी :- दि. २४ जुलै २०२६ पातूर शहरातील नगर परिषद अंतर्गत असलेल्या सार्वजनिक बागेची सध्याची अवस्था अत्यंत जीर्ण व दुर्लक्षित झाल्याने तिचे तातडीने नूतनीकरण, सुशोभीकरण आणि नागरिकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात,या मागणीसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना,पातूर तालुका यांच्या वतीने नगर परिषद चे नगराध्यक्ष मा.हिदायत खान रूम खान,उपाध्यक्ष मा.अजय पाटील यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,शहरातील सार्वजनिक बाग ही नागरिक,ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी विरंगुळा,व्यायाम व आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे ठिकाण आहे.मात्र,सध्या बागेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून परिसरात अस्वच्छता, मोडकळीस आलेली बाके, खराब पायवाटा,अपुरी प्रकाश व्यवस्था तसेच खेळण्यांची कमतरता यामुळे नागरिकांना बागेचा सुरक्षित आणि सोयीस्कर वापर करता येत नाही.यामुळे नगर परिषद प्रशासनाने सार्वजनिक हित लक्षात घेऊन बागेचे तातडीने नूतनीकरण करण्याची मागणी संघटनेने केली आहे.निवेदनामध्ये बागेची संपूर्ण साफसफाई करून नियमित देखभाल करणे, नवीन झोपाळे, घसरगुंडी व इतर खेळणी बसविणे, खराब झालेली बाके दुरुस्त करून नवीन बाके बसविणे, पायवाटांची दुरुस्ती करून पेव्हर ब्लॉक टाकणे, आकर्षक फुलझाडे व शोभेच्या वृक्षांची लागवड करणे, पुरेशी एलईडी प्रकाश व्यवस्था उभारणे, पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, कचरापेट्या बसवून नियमित स्वच्छता राखणे, बागेचे कंपाऊंड व प्रवेशद्वाराची दुरुस्ती करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था तसेच मुलांसाठी सुरक्षित खेळण्याचा विभाग तयार करणे, नियमित देखभालीसाठी आवश्यक कर्मचारी नियुक्त करणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.संघटनेने म्हटले आहे की, या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास सार्वजनिक बाग पुन्हा एकदा नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल. शहराच्या सौंदर्यात भर पडेल, पर्यावरण संवर्धनाला चालना मिळेल तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना सुरक्षित, स्वच्छ व आनंददायी वातावरणात वेळ घालविण्याची संधी उपलब्ध होईल.नगर परिषद प्रशासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून जनहित लक्षात घेत आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे.यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, पातूर तालुकाचे तालुका अध्यक्ष अर्जुनसिंह गहिलोत, तालुका उपाध्यक्ष अविनाश पोहरे, सचिव पवन तांबे, प्रसिद्धी प्रमुख आशिष शेगोकार यांच्यासह सम्राट खंडारे, किशोर बागडे, चेतन निमकंडे, योगेश बांगर, रोहित कावळे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.







