“केक नको, वृक्ष भेट द्या” या संदेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पातूर,(प्रतिनिधी): वाढदिवस म्हटला की केक कापणे, फटाके,जल्लोष आणि विविध कार्यक्रम हे नेहमीचे चित्र असते.मात्र,पर्यावरण संवर्धनाची सामाजिक जाणीव जोपासत अमोलभाऊ घायवट यांनी यंदाचा वाढदिवस अत्यंत वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा केला.

“कृपया माझ्यासाठी केक कापू नका,त्याऐवजी मला एक वृक्ष भेट द्या” असे आवाहन करत त्यांनी वृक्षारोपणाचा संकल्प केला आणि उपस्थित मान्यवरांसह वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला

.यावेळी पातूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रदीप गुजर, सहाय्यक गट विकास अधिकारी नायसे साहेब, विस्तार अधिकारी लव्हाळे, विस्तार अधिकारी ठाकरे, विस्तार अधिकारी सोळंके, ग्रामपंचायत अधिकारी आर. डी.अरखराव,नंदू इंगळे, हरीश गोळे,विनोद आगळे, रितेश सवाईश्याम,अक्षय गाडगे,चवरे,प्रतीक नागापुरे, रवि तेलगोटे,आतिश पवार, पंचायत समिती कर्मचारी पंकज वाकोडे तसेच इतर सहकारी व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी अमोलभाऊ घायवट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या पर्यावरणपूरक विचारांचे मनापासून कौतुक केले.प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी आपला सहभाग नोंदविला.वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत, वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणांनाही सामाजिक जबाबदारीची जोड देण्याची गरज असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
अमोलभाऊ घायवट यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,”केकचा आनंद काही क्षणांचा असतो पण एक वृक्ष अनेक वर्षे प्राणवायू, सावली,फळे आणि पर्यावरणाचे रक्षण करत राहतो.त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वाढदिवसासह प्रत्येक शुभप्रसंगी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. वृक्ष लावणे हीच भावी पिढ्यांसाठी खरी भेट आहे.”या उपक्रमाद्वारे केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांनी नियमितपणे वृक्षारोपण करण्याचा आणि लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.
उपस्थित सर्वांनी “एक वृक्ष – सर्वोत्तम भेट” हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी,पर्यावरण संवर्धन आणि सकारात्मक विचारांचा आदर्श ठरला असून,परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
“वाढदिवस साजरा करण्याची पद्धत बदलूया… केकऐवजी वृक्ष लावूया, पर्यावरण वाचवूया आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करूया,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. 🌱🌳






