पातूर/अकोला (प्रतिनिधी) – अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आमदार नितीन देशमुख यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून लक्ष वेधले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, अकोला जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः फळबागा आंबा लिंबू टरबूज खरबूज गहू, हरभरा, कांदा भाजीपाला यांसारख्या पिकांना फटका बसला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

आमदार देशमुख यांनी प्रशासनाला निर्देश दिले की, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित शेतात जाऊन पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी. तसेच कोणत्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवू नये, याची खबरदारी घेण्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जलदगतीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत आमदार देशमुख यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन प्रशासनाला केले आहे.







