पातुर प्रतिनिधी :- दि. ११ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.नलिनीताई राऊत आयुर्वेद रुग्णालय व अनुसंधान केंद्र,पातुर येथे मुख्यमंत्री सहायता कक्ष,मंत्रालय मुंबई व रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यावेळी महाविद्यालयाचे संचालक डॉ.साजिद शेख,प्राचार्य डॉ. अभय भुस्कडे, वैद्यकीय अधीक्षिका डॉ.जयश्री काटोले,डॉ. आशिष केचे,डॉ.भोळे मॅडम,डॉ.विक्रम चव्हाण,डॉ.लांडकर, डॉ.तोंचार,रुग्णालय अधीक्षक धनंजय मिश्रा,प्रशासकीय अधिकारी संतोष सोमानी,उपअधीक्षक डॉ.वसीम, तसेच वैद्यकीय शिक्षक,निवासी वैद्यकीय अधिकारी,परिचारिका, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर आरोग्य तपासणी करून घेतली.विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला व उपचार देण्यात आले.महाविद्यालयाच्या वतीने गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले तसेच आवश्यक ती औषधेही पूर्णपणे मोफत देण्यात आली.सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.रुग्णांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत महाविद्यालय,रुग्णालय प्रशासन आणि मुख्यमंत्री सहायता कक्षाचे आभार मानले. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या जनकल्याणकारी उपक्रमामुळे अनेक गरजू रुग्णांना आरोग्यसेवेचा थेट लाभ मिळाला असून,समाजाभिमुख आरोग्यसेवेचा आदर्श निर्माण झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.






