सावित्रीबाई फुले विद्यालयात लोकशाही पद्धतीने शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात”
पातूर प्रतिनिधी :विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी,तसेच शासनव्यवस्थेची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने सावित्रीबाई फुले प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक संपूर्ण लोकशाही पद्धतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या निवडणुकीत सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.उमेदवारी अर्ज भरणे,अर्ज छाननी,अर्ज मागे घेणे,प्रचारासाठी स्वतंत्र वेळ देणे तसेच मतदान प्रक्रिया अशा सर्व टप्प्यांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना देश,राज्य,जिल्हा आणि गावाचा कारभार लोकशाही पद्धतीने कसा चालतो,

याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.शाळेच्या प्रशासनात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढावा यासाठी शिक्षण,आरोग्य, क्रीडा,सांस्कृतिक तसेच महिला व बालकल्याण अशा विविध खात्यांची निर्मिती करण्यात आली आहे.या निवडणुकीत विजयी झालेले विद्यार्थी संबंधित खात्यांचे मंत्री म्हणून वर्षभर कार्यरत राहणार असून विद्यार्थ्यांच्या समस्या,सूचना व गरजा शाळा व्यवस्थापनापर्यंत पोहोचवून त्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतील.यावर्षी प्रथमच महिला व बालकल्याण खाते स्थापन करण्यात आले असून त्यासाठी स्वतंत्र मंत्रिपदाचीही निर्मिती करण्यात आली आहे.या माध्यमातून शाळेतील मुलींच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्न, अडचणी आणि आवश्यक बाबी प्रभावीपणे हाताळण्यास मदत होणार आहे.या निवडणुकीत निवडून आलेले विद्यार्थी विविध खात्यांचे मंत्री म्हणून कार्य करतील,तर त्यांच्यामधूनच लोकशाही पद्धतीने शालेय मुख्यमंत्री निवडण्यात येणार आहे.सदर निवडणूक प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समितीच्या सूचनेनुसार प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन ढोणे व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक जे.डी.कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.ही प्रक्रिया राबविण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.






