पातूर | प्रतिनिधी
पातुर तालुक्यात समाजहिताच्या नावाखाली आंदोलन, उपोषण, माहिती अधिकार (RTI) अर्ज आणि तक्रारींचा वापर करून काही तथाकथित कार्यकर्ते सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. “लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB) धाड पडणार”, “मोठी तक्रार दाखल केली आहे”, “माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध होणार” अशा अफवा पसरवून संबंधित अधिकाऱ्यांना मानसिक दबावाखाली आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, काही जण समाजसेवेचा आव आणत आंदोलन व उपोषणाची घोषणा करतात. त्यानंतर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून प्रकरण मिटविण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जनहितासाठी लढणाऱ्या प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिमा देखील मलिन होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

माहिती अधिकार हा पारदर्शक प्रशासनासाठी प्रभावी कायदा असून त्याचा वापर जनहितासाठी व्हावा, अशी अपेक्षा आहे. मात्र वैयक्तिक स्वार्थ, दबावतंत्र किंवा आर्थिक लाभासाठी या कायद्याचा गैरवापर होत असेल तर त्याची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच समाजसेवेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित खंडणीच्या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी विविध स्तरातून पुढे येत आहे.






