पातूर, प्रतिनिधी : पातूर शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या संभाव्य धाडीची चर्चा रंगताच व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली आहे.शहरात अन्न व औषध प्रशासनाचे पथक तपासणीसाठी येणार असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच अनेक व्यावसायिकांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.विशेषतः पानटपऱ्या,खाद्यपदार्थ विक्रेते तसेच काही किरकोळ व्यावसायिकांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून,काही ठिकाणी पानटपऱ्या आणि खाद्यपदार्थांची दुकाने तात्पुरती बंद ठेवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातील प्रमुख चौकांमध्ये दिवसभर याच चर्चेला उधाण आले होते.अन्न सुरक्षा नियमांचे पालन,खाद्यपदार्थांची गुणवत्ता, परवान्यांची पूर्तता आणि स्वच्छतेच्या निकषांची तपासणी होणार असल्याची चर्चा व्यापाऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या आस्थापनांमधील कागदपत्रांची पडताळणी आणि स्वच्छतेची व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान,अधिकृतरीत्या धाडीबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसली तरी शहरभर सुरू असलेल्या चर्चेमुळे व्यापारी वर्गात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची शक्यता लक्षात घेता नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना मात्र कोणतीही भीती नसल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.






