पातुर, प्रतिनिधी : पातुर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. येत्या 20 जून रोजी मतदान होणार असल्याने सर्वच पक्षांनी प्रचार यंत्रणा अधिक सक्रिय केली आहे. दरम्यान, विविध पक्षांच्या उमेदवारांना पक्षस्तरावरून निवडणूक खर्चासाठी निधी प्राप्त झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
यंदाच्या निवडणुकीत शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युती तसेच विकास योद्धा विकास मंच या प्रमुख पक्ष व आघाड्यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. प्रचारासाठी आवश्यक आर्थिक मदत व पक्षनिधी स्थानिक नेत्यांकडे पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षनिधीबाबत अधिकृतरीत्या कोणत्याही पक्षाकडून माहिती देण्यात आलेली नसली तरी शहरात विविध राजकीय चर्चा सुरू असून प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी प्रचार साहित्याची तयारी, कार्यकर्त्यांच्या बैठका तसेच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
निवडणुकीच्या तारखा जवळ येत असल्याने पातुर शहरातील राजकीय हालचालींना मोठा वेग आला असून आगामी काही दिवसांत प्रचाराचा धुरळा उडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे यंदाची नगरपरिषद निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.





