पातूर (प्रतिनिधी) – पातूर तालुक्यातील शिरला येथे तपे हनुमान संस्थेच्या वतीने भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेला शिरला, नांदखेड, भंडारज, पातूर, चिखलगाव आदी परिसरातून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी तपे हनुमानाचे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली.
या प्रसंगी बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी यात्रेला भेट देऊन तपे हनुमान मंदिरात विधिवत पूजन केले. यावेळी तपे हनुमान संस्थेच्या वतीने आमदार देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे शिरला, नांदखेड, भंडारज येथील आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रा महोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.







