तालुका प्रतिनिधी पातुर….
गेल्या आर्थिक वर्ष 2025–2026 साठी नोंदणी व मुद्रांक विभागाकडून सह दुय्यम निबंधक,पातूर कार्यालयाला सात कोटी रुपयांच्या महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे उद्दिष्ट 101.95 टक्क्यांपर्यंत पूर्ण करण्यात यश आले आहे.एकूण 7 कोटी 13 लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला असून,हे यश उल्लेखनीय मानले जात आहे.
या महसूलात मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क,ई-फायलिंगद्वारे मिळालेला महसूल, मुद्रांक विक्री तसेच चुकविलेला मुद्रांक शुल्क वसुली यांचा समावेश आहे. विविध माध्यमांचा प्रभावी वापर करून महसूल वाढवण्यात आला आहे.
कार्यालयाच्या या यशामागे सक्षम नियोजन, नियमित आढावा बैठका आणि नागरिकांना दिली जाणारी जलद व पारदर्शक सेवा यांचा मोठा वाटा आहे.तसेच,ऑनलाइन प्रणालींचा वाढता वापर आणि ई-फायलिंग प्रक्रियेमुळे व्यवहार अधिक सुलभ झाले असून,त्याचा सकारात्मक परिणाम महसूल वाढीवर दिसून आला आहे.सदर उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी माननीय श्री. किरण चौधरी, सह जिल्हा निबंधक वर्ग 1 अकोला यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या सूचनांनुसार कार्यपद्धतीत सुधारणा करून महसूल वसुलीत गती देण्यात आली.या यशाबद्दल सह दुय्यम निबंधक कू. डी.डी.वर्गे तसेच पातूर दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.आगामी काळातही याच पद्धतीने अधिक कार्यक्षमतेने काम करून महसूल वाढीस हातभार लावण्याचा संकल्प कार्यालयाने व्यक्त केला आहे.







