पातूर, प्रतिनिधी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान), मुख्यमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी तसेच पोखरा योजनेच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करून शेतकऱ्यांना प्रभावी मार्गदर्शन देण्याची मागणी पातूर तालुक्यातील शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात कृषी विभागाला निवेदन देण्यात आले असून, १५ दिवसांच्या आत मंडळनिहाय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित न केल्यास कृषी कार्यालयासमोर ‘भिक मागो’ आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पीएम किसान योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्वी अनुदानाची रक्कम जमा होत होती. मात्र विविध तांत्रिक कारणांमुळे अनेक लाभार्थी सध्या या योजनेपासून वंचित राहिले आहेत. बँक खाते, ई-केवायसी, आधार लिंकिंग तसेच संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असून त्यांना आर्थिक फटका बसत आहे.
तसेच मृत शेतकऱ्यांच्या खात्यातील प्रलंबित अनुदानाची रक्कम त्यांच्या वारसांना मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतही अपुऱ्या मार्गदर्शनामुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय शेतकरी हिताची पोखरा योजना अधिक प्रभावीपणे राबवून लाभ मिळविण्याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देण्यासाठी मंडळनिहाय शिबिरे आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील एकही शेतकरी योजनांपासून वंचित राहू नये यासाठी कृषी विभागाने विशेष मोहीम राबवावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, संबंधित विषयांवर १५ दिवसांच्या आत मंडळनिहाय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करून याबाबत लेखी खुलासा सादर करावा, अन्यथा शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने कृषी कार्यालयासमोर भिक मागो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी अकोला, जिल्हा कृषी अधीक्षक अकोला तसेच तहसीलदार पातूर यांना पाठविण्यात आल्या आहेत.






