पातूर प्रतिनिधी : पुणे येथे दि. १४ जून रोजी आनंदा फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.या सोहळ्यात अकोला विभागातून नवनाथांची सात्विक पद्धतीने सेवा करणारे, गोरक्षण कार्यात सक्रिय योगदान देणारे तसेच युवा पिढीमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणारे श्री श्री १०८ श्री महंत गणेशानंदगिरी महाराज यांना राज्यस्तरीय सह्याद्रीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा मानाचा पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते सुनील नाना गोडबोले,कायदेतज्ज्ञ ॲड.गांधी साहेब तसेच उद्योजिका श्रीमती पाटील मॅडम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना महाराजांनी हा सन्मान समाजसेवा,गोरक्षण आणि धार्मिक कार्यासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.यापूर्वी उज्जैन येथे झालेल्या साधुसंतांच्या बैठकीत आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा यांनी महाराजांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेत त्यांचा पट्टाभिषेक करून “श्री श्री १०८ श्री महंत गणेशानंदगिरी महाराज” ही पदवी बहाल केली होती.महंत गणेशानंदगिरी महाराज गेल्या अनेक वर्षांपासून गोरक्षण,धार्मिक सेवा,युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल राज्यस्तरावर घेतली जात असून विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या यशाचे श्रेय महाराजांनी आपले गुरु श्री श्री १००८ माता सती नंदगिरी महामंडलेश्वर, उज्जैन,गावकरी मंडळी तसेच सहकाऱ्यांना दिले.भविष्यातही समाजहिताचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.या पुरस्कारामुळे पातूर परिसरासह अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून भाविक व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.






