पातूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार स्थानिक सनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक गुरुवारी दुपारी पार पडली. या बैठकीस बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन बापू देशमुख प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार देशमुख यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत सांगितले की, जिल्ह्यातील एकाही बांधकाम कामगारावर अन्याय होऊ नये. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व जबाबदारीने काम करावे.
बैठकीदरम्यान समितीच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे तसेच कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. अनेक कामगार केवळ माहितीअभावी योजनांपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे गावपातळीवर जनजागृती मोहीम राबवून प्रत्येक कामगारापर्यंत माहिती पोहोचवावी, असा आग्रह आमदार देशमुख यांनी व्यक्त केला.
तसेच समितीच्या कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी दर महिन्याला सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. समितीने सक्रियपणे काम करत कामगारांच्या अडचणी सोडवाव्यात आणि त्यांच्या हक्कासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीस समितीचे सचिव महेंद्र जाधव, सदस्य ज्ञानेश्वर भाऊ मसने, उमेश मारोती लासुरकर, सौ. संगीता वामन राठोड, सौ. नीता गणेश घुगे, गोपाल बाबूलाल गुंजकर, मनोज बाविस्कर, राहुल भाऊ कराळे, वाकोडे ताई, नोंदणी अधिकारी किरण राठोड, अमर केतखडे, सौ. योगिता मालोकार, ज्ञानेश्वर केदारे, प्रशांत सराग यांच्यासह समिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत समितीमार्फत कामगारांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






