पातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पातूर शहरात भव्य आणि उत्साहपूर्ण मिरवणूक काढून अभिवादन करण्यात आले. भिमजयंती सार्वजनिक उत्सव समिती, पातूर शहराच्या वतीने १४ एप्रिल रोजी आयोजित या मिरवणुकीत शहरातील विविध मंडळांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
मिरवणुकीत रत्नदीप मित्र मंडळ (महात्मा फुले नगर), भिमशक्ती व्यायाम शाळा (भिमनगर), मिलिंद नवयुवक मंडळ (मिलिंद नगर), समता नवयुवक मंडळ (समता नगर), भिमज्योत व्यायाम शाळा (पंचशील नगर), भिमक्रांती व्यायाम शाळा (आंबेडकर नगर), भिमराजे ग्रुप (गहिलोत लेआऊट) आदी मंडळांनी आकर्षक देखावे, डीजे, बँड पथक आणि व्यायाम प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून वातावरण भारावून टाकले.

विशेषतः भिमशक्ती व्यायाम शाळेच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. वाघाचे रूप धारण करून सादर करण्यात आलेला पारंपरिक “वाघ खेळ” हा मिरवणुकीचा मुख्य आकर्षण ठरला.
मिरवणुकीची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, भिमनगर येथून झाली. त्यानंतर महात्मा फुले स्मारक, संभाजी चौक, मिलिंद नगर, भगत वेटाळ, कान्होबा चौक मार्गे महात्मा फुले नगर (बाळापूर वेस) येथे समारोप करण्यात आला.
समारोपीय कार्यक्रमाला पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हणमंत डोपेवाड, पोलीस उपनिरीक्षक बंडू मेश्राम, त्यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच त्रिशरण-पंचशील ग्रहण करण्यात आले. चिमुकल्यांनी आपल्या भाषणातून बाबासाहेबांच्या विचारांवर प्रकाश टाकला.
रत्नदीप मित्र मंडळाच्या सौजन्याने पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. यामध्ये प्रथम पारितोषिक भिमशक्ती व्यायाम शाळा, द्वितीय पारितोषिक समता नवयुवक मंडळ तर तृतीय पारितोषिक भिमक्रांती व्यायाम शाळा यांनी पटकावले.
कार्यक्रमादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेऊन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल पातूर पोलिसांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रम भिमजयंती सार्वजनिक उत्सव समितीचे स्वप्निल सुरवाडे यांच्या नियोजनात यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल सुरवाडे, भगवान डोंगरे, भास्कर सुरवाडे, विनोद सिरसाट, माणिक सुरवाडे, अमोल बागडे, प्रमोद खंडारे, निर्भय पोहरे, कपिल पोहरे, जितेश सिरसाट, धिरज खंडारे, प्रविण पोहरे, भिमराव पोहरे, सचिन सुरवाडे, मंगेश डोंगरे, सतिश सुरवाडे, सचिन पोहरे, सागर इंगळे, मंगेश गवई, जितेंद्र तेलगोटे, प्रमोद सुरवाडे, सिद्धार्थ सुरवाडे, आकाश घुगे, ऋतिक निखाडे, आकाश बारताशे, गौरव डोंगरे, अक्षय मालसुरे, प्रेम सुरवाडे, अमोल सुरवाडे, आशिष सुरवाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.






