पातूर : सोन्याच्या नाण्यांचा माठ सापडल्याचे सांगून एका व्यक्तीचा विश्वास संपादन करत तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला वाशिम कारागृहातून प्रॉडक्शन वॉरंटद्वारे ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून फसवणुकीच्या रकमेशी संबंधित 80 हजार रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
पातूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अप. क्र. 342/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवराज कांबळे, रा. वडगणे, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांना आरोपींनी त्यांच्या घरामध्ये सोन्याच्या नाण्यांचा माठ सापडला असून, सदर नाणी विकायची असल्याचे सांगितले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी प्रथम फिर्यादीला एक असली सोन्याचे नाणे दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडे अशाच प्रकारची सुमारे 3 किलो 300 ग्रॅम सोन्याची नाणी असल्याचे सांगण्यात आले.
यानंतर फिर्यादीला कोल्हापूरहून पातूर घाट परिसरातील नांदखेड फाटा येथे बोलावून घेण्यात आले. तेथे आरोपींनी 3 किलो 300 ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे कॉईन फिर्यादीच्या ताब्यात देत त्याबदल्यात 15 लाख रुपये रोख घेतले आणि घटनास्थळावरून पसार झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पातूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.
वाशिम कारागृहातून आरोपीला ताब्यात
गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी विनोद मच्छिंद्र चव्हाण, रा. डव्हा, ता. मालेगाव, जि. वाशिम हा अन्य एका प्रकरणात वाशिम कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पातूर येथील गुन्ह्यात त्याचा तपास आवश्यक असल्याने न्यायालयाची परवानगी घेऊन प्रॉडक्शन वॉरंटद्वारे त्याला वाशिम कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीने गुन्ह्यातील सहभागाबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात आले. तसेच मुख्य आरोपी नारायण सिताराम पवार, रा. आंत्रज, ता. खामगाव, जि. बुलढाणा याच्यासह आणखी एका व्यक्तीच्या सहभागाबाबतही माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
80 हजारांची रोकड जप्त
तपासादरम्यान आरोपीकडून फसवणुकीच्या रकमेशी संबंधित 80 हजार रुपये रोख रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. आरोपीला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पातूर पोलिसांकडून तपास सुरू असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर आणि पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास गोसावी तसेच पोलीस अंमलदार दाऊद शेख, उमेश सांगळे, योगेश मुळवंडे आणि इस्माईल मुल्ला यांनी केली.
बनावट सोन्याच्या नावाखाली झालेल्या या मोठ्या फसवणुकीमुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींकडून सोन्याचे व्यवहार करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.







