पातूर प्रतिनिधी : पातूर तालुक्यातील प्रसिद्ध धोधाणी धबधबा पर्यटनस्थळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत युवक अकोला शहरातील खैर मोहम्मद प्लॉट,शरीफ नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून,

धोधाणी पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित तरुण आपल्या मित्रांसोबत धोधाणी येथे फिरण्यासाठी आला होता.

पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला.घटना लक्षात येताच स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणांनी बचावकार्य सुरू केले. तरुणाला पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.धोधाणी पर्यटनस्थळी बेफाम मौजमजेला आळा कधी ?धोधाणी परिसरात सुट्टीच्या दिवशी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मात्र,काही पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन करून धोकादायक ठिकाणी जाणे,पाण्यात उतरणे, मद्यप्राशन करून धिंगाणा घालणे तसेच अतिवेगाने वाहने चालविण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात येत आहेत.विशेषतः मद्यप्राशन करून मौजमजा करणाऱ्या काही तरुणांकडून परिसरातील शांतता व सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.अशा प्रकारांमुळे स्वतःच्या जीवाला धोका निर्माण होण्यासोबतच इतर पर्यटकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होतो.वारंवार दुर्घटना,तरी सुरक्षा व्यवस्था अपुरी?
धोधाणी पर्यटनस्थळी यापूर्वीही पाण्यात बुडण्याच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे धोकादायक ठिकाणी मजबूत सूचना फलक,प्रतिबंधित क्षेत्राची स्पष्ट आखणी,आवश्यक सुरक्षा कर्मचारी,मदत व बचाव साहित्य तसेच पोलिसांचा प्रभावी बंदोबस्त असणे गरजेचे आहे.वन विभाग,पोलीस प्रशासन आणि संबंधित पर्यटन यंत्रणेने संयुक्तपणे धोधाणी परिसराची पाहणी करून मद्यप्राशन करून येणाऱ्यांवर,बेफाम वाहनचालकांवर आणि धोकादायक ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.दुर्घटना घडल्यानंतर बचावकार्य करण्यापेक्षा दुर्घटना होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे आहे.धोधाणी येथे कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारून पर्यटकांच्या जीविताची जबाबदारी निश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे.धोधाणी पर्यटनस्थळ सुरक्षित की बेफाम मौजमजेचे केंद्र? हा प्रश्न या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनासमोर उभा राहिला आहे.







