पातूर (प्रतिनिधी) – सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तसेच “शिक्षण क्रांतिकारी” म्हणून ओळखले जाणारे डॉ. साजिद शेख यांची मुस्लिम वेलफेअर असोसिएशनच्या विदर्भ महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे विदर्भातील शैक्षणिक व सामाजिक कार्याला नवचैतन्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
डॉ. शेख यांनी गेल्या १५ ते २० वर्षांपासून शिक्षण व समाजसेवा क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी, नर्सिंग आणि फिजिओथेरपी या क्षेत्रातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये डायरेक्टर म्हणून कार्य करत त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते.
सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेद महाविद्यालय, होमिओपॅथिक महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय, फिजिओथेरपी महाविद्यालय तसेच परभणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये ते डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध व्यावसायिक क्षेत्रात यश संपादन केले आहे.
याशिवाय ते अध्यक्ष – मानव परिवर्तन संस्था (पातूर, अकोला), अध्यक्ष – रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (पातूर, अकोला) आणि सचिव – युनिक फाउंडेशन (औरंगाबाद) या पदांवरही कार्यरत असून, या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजाभिमुख उपक्रम राबवले आहेत. गरजू विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर व नर्सिंग शिक्षणासाठी मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

डॉ. साजिद शेख यांच्या कार्याची दखल घेत मुस्लिम वेलफेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सलीम सारंग यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली असून, त्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी युवक आघाडीचे विदर्भ सचिव मोहम्मद फरहान अमीन व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सलीम सारंग यांनी डॉ. शेख यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेच्या कार्याला विदर्भात नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
डॉ. साजिद शेख यांच्या नियुक्तीमुळे विदर्भातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.







