पातुर (प्रतिनिधी): पातुर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध जुगार व्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी धडक कारवाई करत १० आरोपींना ताब्यात घेतले असून ₹४२,४३० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अकोला पोलीस दलातील मा. पोलीस अधीक्षक अर्चना चांडक यांच्या निर्देशानुसार “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विजय टॉकीजजवळील आठवडी बाजार परिसरात छापा टाकला.
या ठिकाणी काही इसम “वरली मटका” जुगार तसेच “FUN TARGET ONLINE” कॅसिनो ॲपच्या माध्यमातून पैशांची खायावादी करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापा टाकत एकूण १० जणांना ताब्यात घेतले.
आरोपींकडून वरली मटका साहित्य, पेन, कार्बन तुकडे, रोख रक्कम तसेच ऑनलाईन जुगारासाठी वापरले जाणारे संगणक साहित्य असा एकूण ₹४२,४३० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पंचांसमक्ष ही जप्ती करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पो.नि. शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विजय जाधव, पोउपनि गोपाल जाधव यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.






