पातूर प्रतिनिधी :
अकोला जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली असून बहुप्रतीक्षित पातूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून गल्लीपासून शहरापर्यंत राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
पातूर नगरपरिषदेची प्रभाग रचना वेळेत पूर्ण न झाल्याने संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक नव्याने जाहीर करण्याची वेळ आली.त्यामुळे ही निवडणूक आता सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार असून अनेक इच्छुक उमेदवार मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत.महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १०अ पोटकलम (४) अंतर्गत अधिकारांचा वापर करून हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.यासोबतच राज्यातील इतर तीन नगरपरिषदांतील रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
निवडणूक कार्यक्रम असा जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर : १२ मे २०२६ नामनिर्देशनपत्र स्वीकृती कालावधी : १८ मे ते २५ मे २०२६
(सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत)
२३ व २४ मे रोजी सुट्टीमुळे अर्ज स्वीकृती बंद
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : २ जून २०२६
मतदान : २० जून २०२६, सकाळी ७.३० वाजल्यापासून
मतमोजणी व निकाल : २१ जून २०२६ (रविवार)
या निवडणुकीकडे संपूर्ण अकोला जिल्ह्याचे लक्ष लागले असून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. स्थानिक पातळीवरील विकासकामे,गटबाजी,नाराज कार्यकर्ते तसेच नव्या चेहऱ्यांची एन्ट्री यामुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेषतः पातूरमध्ये सत्तांतर होणार का,सत्ताधारी पुन्हा सत्ता टिकवणार का,की एखादा नवा गट बाजी मारणार याबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, विविध राजकीय पक्षांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली असून शहरात बैठका,प्रचारयोजना आणि संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा रंगू लागली आहे. आगामी काही दिवसांत अकोला जिल्ह्याचे राजकारण आणखी तापणार हे निश्चित मानले जात आहे.






