पातूर : महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करून नागपूर शहर पोलीस दलात निवड झालेल्या कु. निशा राजेश वानखडे (रा. पेडगाव) हिचा नुकताच सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. मंगरूळपीर तालुक्यातील
पत्रकार राजेश वानखडे यांच्या कन्येच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पेडगाव येथे आयोजित कार्यक्रमाला परिसरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंगळूरपीर पोलीस निरीक्षक किशोर जी. शेळके होते.
यावेळी तहसीलदार सुधाकर अनासुने, निवासी तहसीलदार रवी राठोड, नगरपरिषद अध्यक्ष अशोक पळळीकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कु. निशा वानखडे हिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
मार्गदर्शन करताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करावे, असे आवाहन केले. निशाने स्वतःच्या मेहनतीच्या बळावर पोलीस भरतीत यश मिळवून परिसरातील युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षकवृंद तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी निशाच्या यशाचे कौतुक करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या यशामुळे पेडगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.






